पाणी वाचवा, निसर्ग वाचवा – गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांचा महत्वपूर्ण संदेश
आबलोली (संदेश कदम)

गुहागर तालुक्यातील आबलोली येथे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित विशेष कार्यक्रमात पंचायत समिती गुहागरचे गटविकास अधिकारी शेखर भिलारे यांनी उपस्थितांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून दिले. “पाणी हेच जीवन आहे, पाण्याशिवाय शेती आणि पर्यायाने मानवाचे अस्तित्वही धोक्यात येईल. त्यामुळे प्रत्येकाने पाण्याचे संवर्धन करणे ही काळाची गरज आहे,” असे भिलारे यांनी स्पष्ट केले.
डि. एड. कॉलेज, आबलोलीच्या भव्य सभागृहात स्वर्गीय वसंतराव नाईक पुरस्कार प्राप्त निर्मल ग्रामपंचायत आबलोली व पाणलोट विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने पाणलोट क्षेत्र रथयात्रा आणि विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी शेखर भिलारे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.
यावेळी बोलताना भिलारे म्हणाले, “भारत हा कृषीप्रधान देश आहे, आणि देशातील ५० ते ६० टक्के लोकसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. मात्र, शेतीसाठी पाणी अत्यंत महत्त्वाचे असून, सध्या जलसाठ्यांची स्थिती गंभीर आहे. जलस्रोत टिकवण्यासाठी वृक्षलागवड करणे, निसर्ग संवर्धन करणे आणि पडणाऱ्या पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करणे गरजेचे आहे.”
या वेळी व्यासपीठावर जलसंधारण विभागाच्या निलम पालव, भूमी संधारण विभागाच्या टेक्निकल एक्सपर्ट श्वेता नारायण, जिल्हा समन्वयक जस्मिन गार्दी, तालुका कृषी अधिकारी अमोल शिरसागर, ग्रामीण पाणीपुरवठा उपविभाग गुहागरचे उप अभियंता मंदार छत्रे, आबलोलीच्या सरपंच वैष्णवी नेटके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाला महिलांचा मोठा प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितेश पांचाळ यांनी केले, तर निर्मल ग्रामपंचायत आबलोली आणि पाणलोट विकास समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.
Discover more from Ratnagiri Vartahar
Subscribe to get the latest posts sent to your email.