ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; अमली पदार्थांविरोधात सामूहिक लढ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्यासाठी सर्व घटकांनी पुढे यावे; शाळा-महाविद्यालय परिसरातील ड्रग्स रॅकेटवर कठोर कारवाईचा इशारा

 

मुंबई | प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘नशामुक्त भारत’ संकल्पनेला बळ देण्यासाठी राज्य शासनाने ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ केला. वरळी डोम येथे झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमली पदार्थांविरोधातील लढा हा केवळ कायदा-सुव्यवस्थेचा विषय नसून देशाच्या भवितव्याशी संबंधित असल्याचे सांगत, ‘ड्रग फ्री मुंबई’, ‘ड्रग फ्री महाराष्ट्र’ आणि ‘ड्रग फ्री भारत’ घडविण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.

 

मुख्यमंत्री म्हणाले की, भारत विज्ञान, तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, अंतराळ संशोधन आणि संरक्षण क्षेत्रात वेगाने प्रगती करत असताना देशातील युवकांना अमली पदार्थांच्या विळख्यात अडकविण्याचा कट रचला जात आहे. ड्रग्स हे या छुप्या युद्धातील सर्वात धोकादायक शस्त्र असून त्याविरोधातील लढा प्रत्येक नागरिकाने स्वतःचा समजून लढला पाहिजे.

 

अमली पदार्थमुक्त समाज घडविण्यासाठी पोलीस, आरोग्य, सामाजिक न्याय, शालेय शिक्षण विभाग, पालक, शिक्षक, विद्यार्थी आणि समाजातील सर्व घटकांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. ड्रग्सची निर्मिती, तस्करी आणि विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाईल. विशेषतः शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळ्यांचा संपूर्ण नायनाट करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

 

फडणवीस यांनी सांगितले की, पुढील दोन ते चार वर्षांत ‘ड्रग फ्री मुंबई’ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. प्रत्येक विद्यार्थी हा समाजाचे डोळे आणि कान असून, ड्रग्सचा व्यापार करणाऱ्यांविषयी माहिती देण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. माहिती देणाऱ्यांची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल तसेच उपयुक्त माहिती देणाऱ्यांना पुरस्कारही दिले जातील, अशी घोषणाही त्यांनी केली.

 

राज्यातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक आणि महाविद्यालयांचे प्राचार्य यांना मार्गदर्शक सूचना पाठविण्यात येणार असून ‘ड्रग फ्री कॅम्पस’ आणि ‘ड्रग फ्री स्कूल’ ही संकल्पना प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. व्यसनाधीन युवकांचे पुनर्वसन करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यावरही शासन विशेष भर देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

 

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ‘ड्रग फ्री मुंबई’ हे केवळ शासनाचे अभियान नसून लोकसहभागातून उभी राहणारी व्यापक जनचळवळ असल्याचे सांगितले. शाळा, महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये जनजागृती, समुपदेशन आणि व्यसन प्रतिबंधक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 

लोढा यांनी यावेळी १५ ऑगस्टपासून ‘सीएम महाधन’ कौशल्य विकास योजना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात एक लाख युवक-युवतींना कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगारासाठी मार्गदर्शन आणि आवश्यक सहाय्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.

 

कार्यक्रमात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी अभियानाची माहिती देताना मुंबईतील शाळा आणि महाविद्यालयांमध्ये ४ हजारांहून अधिक मार्गदर्शन व समुपदेशन समित्या स्थापन करण्यात आल्याचे सांगितले. तसेच १ हजारांपेक्षा अधिक प्रशिक्षित समुपदेशकांचे जाळे उभारण्यात आले असून, अभियानाच्या शुभारंभप्रसंगी ४ हजारांहून अधिक शाळा-महाविद्यालयांतील ५ लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी, पालक आणि नागरिक मुख्यमंत्री यांच्या ऑनलाइन संवादात सहभागी झाले.

 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाठविलेला संदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांनी वाचून दाखविला. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘ट्रेनिंग मॅन्युअल फॉर कौन्सेलर्स’ या प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.

RV.Ratnagiri Office
Author: RV.Ratnagiri Office

रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमी पत्र - एडिटर विभाग

rav watsup

SHARE:

1
Default choosing

Did you like our plugin?

सबसे ज्यादा पढ़ी गई

मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी दीड वर्षांहून अधिक प्रतीक्षा; राज्य व केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) शौचालय योजनेतील कथित भ्रष्टाचार प्रकरणात न्याय कधी

Horoscope

Weather

और पढ़ें

राज्य

शहर चुनें