रत्नागिरीत संविधान सन्मान मंचचा मूक मोर्चा; नीट पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर देशविरोधी प्रवृत्तींचा निषेध
मारुती मंदिर ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकपर्यंत राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा; हजारो नागरिक, विद्यार्थी आणि भाजप पदाधिकारी सहभागी

रत्नागिरी | प्रतिनिधी
नीट (NEET) परीक्षा पेपरफुटीच्या आंदोलनाच्या आडून देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींच्या निषेधार्थ रत्नागिरी येथे संविधान सन्मान मंचच्या वतीने गुरुवार, ३० जुलै रोजी भव्य मूक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. “राष्ट्ररक्षण मूक पदयात्रा” असे या मोर्चाला नाव देण्यात आले होते.
मारुती मंदिर येथून सुरू झालेली ही मूक पदयात्रा डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापर्यंत काढण्यात आली. देशविरोधी कृत्यांचा निषेध आणि संविधानाचा सन्मान राखण्याचा संदेश या मोर्चातून देण्यात आला.
संविधान सन्मान मंचच्या पुढाकाराने आयोजित या पदयात्रेत हजारो युवक, विद्यार्थी, महिला आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. शांततेत आणि शिस्तबद्ध पद्धतीने काढण्यात आलेल्या या मोर्चामुळे शहराचे लक्ष वेधले गेले.
या मोर्चात भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव, सचिन वहाळकर, राजू भाटलेकर, सहदेव बेटकर, लियाकत शहा, ओमकार फडके, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, लोकनियुक्त नगराध्यक्षा सौ. शिल्पाताई सुर्वे, भाजप नगरसेविका वर्षा ढेकणे, राजापूरच्या माजी नगरसेविका शीतल पटेल, रत्नागिरी नगर परिषदेचे स्वीकृत नगरसेवक तथा माजी नगराध्यक्ष बंड्या साळवी, अभिजित शेट्ये, भाजप शहराध्यक्ष दादा ढेकणे, निलेश आखाडे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विद्यार्थी आणि महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
संविधानाचा सन्मान राखत देशविरोधी प्रवृत्तींचा निषेध करण्यासाठी समाजाने एकजुटीने उभे राहण्याचा संदेश या राष्ट्ररक्षण मूक पदयात्रेतून देण्यात आला.










