जीवन शिक्षण शाळा गुहागर क्र. १ मध्ये लोकमान्य टिळक पुण्यतिथी व अण्णाभाऊ साठे जयंतीनिमित्त वक्तृत्व स्पर्धा उत्साहात संपन्न
विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचा आदर्श घ्यावा; गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

गुहागर | प्रतिनिधी :
जीवन शिक्षण शाळा गुहागर क्र. १ येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते चौथी आणि पाचवी ते सातवी अशा दोन गटांमध्ये झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अपग्रेड मुख्याध्यापक ईश्वर वसावे होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनचरित्रातून प्रेरणा घेऊन त्यांचे विचार व गुण आत्मसात करावेत, असे आवाहन केले.
यावेळी मार्गदर्शन करताना गुहागर केंद्रप्रमुख डॉ. मनोज पाटील यांनी लोकमान्य टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील महान नेते, समाजसुधारक आणि प्रभावी पत्रकार होते. त्यांनी केसरी व मराठा या वृत्तपत्रांच्या माध्यमातून समाजात जनजागृती घडवून आणली. विद्यार्थ्यांनी टिळक आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जीवनात प्रगतीची वाटचाल करावी, असे सांगितले.
स्पर्धेच्या निकालात इयत्ता पहिली ते चौथी गटात आस्था ऋषिकेश शेटे हिने प्रथम, स्वराज बोगाणे याने द्वितीय, तर रुअंश तेजस गोयथळे याने तृतीय क्रमांक पटकावला.
इयत्ता पाचवी ते सातवी गटात भवानी सांगळे हिने प्रथम, समृद्धी भंडारे हिने द्वितीय, तर चिन्मय गावडे याने तृतीय क्रमांक मिळविला.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून संजय आवटे, गणेशकर मॅडम आणि राजू सुर्वे यांनी काम पाहिले. स्पर्धेत यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या शुभहस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी ज्येष्ठ शिक्षक संजय आवटे, उपक्रमशील शिक्षक राजू सुर्वे, तंत्रस्नेही शिक्षक अमोल धुमाळ, बागुल मॅडम, गणेशकर मॅडम, ढोणे सर तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व कौशल्याबरोबरच राष्ट्रपुरुषांच्या विचारांविषयी प्रेरणा निर्माण झाली.









