नव तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विधवा प्रथांचे समूळ उच्चाटन करणार – आदिती तटकरे
ग्राम ते वॉर्डस्तर समित्यांच्या सहकार्याने राज्यभर जनजागृती; मानवी अधिकार रक्षणासाठी समाजाला सहभागी होण्याचे आवाहन
बातमी…
नवी मुंबई (मंगेश जाधव):
विधवा महिलांच्या सन्मानपूर्ण जीवनासाठी मिशन वात्सल्य योजनेअंतर्गत नवतंत्रज्ञानाच्या साहाय्याने समाजात जनजागृती करून विधवा प्रथांचे उच्चाटन करण्यात येणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृतीपर कार्यक्रमांचे आयोजन करून या कृप्रथांना पूर्णविराम देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचे त्या म्हणाल्या.
मंत्रालयात विधवा प्रथा बंदीच्या अंमलबजावणीसंदर्भात पार पडलेल्या बैठकीत त्या बोलत होत्या. अजूनही अनेक ठिकाणी महिलांच्या कपाळावरील कुंकू पुसणे, मंगळसूत्र तोडणे, बांगड्या फोडणे, जोडवी काढणे तसेच धार्मिक-सामाजिक कार्यक्रमांपासून दूर ठेवणे यांसारख्या कृप्रथा चालू आहेत. या प्रथांमुळे महिलांचे मूलभूत मानवी हक्क पायदळी तुडवले जात आहेत, हे गंभीर असून त्यावर प्रभावी उपायांची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.
या पार्श्वभूमीवर राज्यभर ग्रामस्तर तसेच शहरी वॉर्डस्तरावर समित्या गठीत करण्यात आल्या असून, या समित्यांद्वारे नागरिकांमध्ये जनजागृती केली जाते. नागरिकांनी अशा घटना निदर्शनास आल्यास संबंधित तालुका व ग्रामस्तरीय समितीला त्वरित कळवावे, असे आवाहनही तटकरे यांनी केले.
ग्रामस्तर समितींमध्ये ग्रामसेवक, वॉर्ड अधिकारी, तलाठी, शिक्षक, अंगणवाडी सेविका यांचा समावेश असून जिल्ह्यात ३६,२०५ ग्रामस्तरीय व ४,९०९ वॉर्डस्तरीय समित्या कार्यरत आहेत. या माध्यमातून मिशन वात्सल्य अंतर्गत विधवा प्रथांचे उच्चाटन हे राज्य शासनाचे ध्येय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
#विधवा_प्रथा_निर्मूलन #आदिती_तटकरे #मिशनवात्सल्य #महिला_हक्क #जनजागृती #समाजपरिवर्तन #नवतेकनॉलॉजी
फोटो