मुंबईत मान्सूनची पहिलीच धडक ठरली धक्कादायक! मध्य रेल्वे खोळंबली, रस्त्यावरही वाहतूक मंदावली
पहाटेपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई, उपनगरांसह नवी मुंबईत जनजीवन विस्कळीत; पुढील चार दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई | प्रतिनिधी मंगेश जाधव.
मुंबईसह उपनगरांमध्ये सोमवारच्या पहाटेपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली असून त्यामुळे मध्य व पश्चिम रेल्वेच्या वेळापत्रकावर परिणाम झाला आहे. लोकलगाड्या १० ते १५ मिनिटं उशिराने धावत असून अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्यामुळे रस्ते वाहतुकीचा वेगही मंदावला आहे. सलग दुसऱ्या दिवशी मुंबईत मान्सूनसदृश्य परिस्थिती अनुभवायला मिळत आहे.
दादर, माटुंगा, वरळी, लालबाग या मध्य मुंबईतील भागांसह वांद्रे, अंधेरी, जोगेश्वरी, दहिसर अशा पश्चिम उपनगरांमध्येही दमदार पावसाने झोडपून काढले आहे. भांडूप, घाटकोपर, ठाणे, नवी मुंबई या भागांमध्ये पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे.
हवामान विभागाने पुढील ३-४ तासांत काही भागांत ५०-६० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा भागांमध्येही पावसाचे पोषक वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस कोकण आणि गोव्यातील बहुतांश भागांत मुसळधार पाऊस पडेल, तर मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातही दोन-तीन दिवस पावसाची शक्यता आहे.
यंदा मान्सूनने १६ वर्षांतील विक्रम मोडीत काढत केरळमध्ये दाखल झाल्यानंतर अवघ्या २४ तासांतच रविवारी तळकोकणात म्हणजेच महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. कर्नाटक आणि संपूर्ण गोव्यातही पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे पुढील दोन-तीन दिवसांत मान्सून संपूर्ण मुंबई, पुणे आणि इतर भागांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
मान्सूनच्या या वेळेआधी आगमनामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरीप हंगामासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे.
#हॅशटॅग्स:
#मुंबईपाऊस #मान्सून2025 #रेल्वेखोळंबा #वाहतूकठप्प #हवामानइशारा #मुंबईउपनगर #कोकणपाऊस #महाराष्ट्रमान्सून
फोटो