मुख्यमंत्र्यांच्या विद्यार्थी सुरक्षा आदेशालाच हरताळ; रायवाडी शाळेतील CCTV ९ महिने बंद.
रत्नागिरी प्रतिनिधी :- निलेश रहाटे
राज्य शासनाने तसेच मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये लाखो रुपये खर्च करून CCTV कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र रत्नागिरी तालुक्यातील वाटद मधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, वाटद रायवाडी येथील CCTV कॅमेरे दि. 27 सप्टेंबर 2025 पासून बंद असल्याचे समोर आले असून, याबाबत वारंवार पत्रव्यवहार व तक्रारी करूनही आजपर्यंत दुरुस्ती करण्यात आलेली नाही.
या संदर्भात शाळेच्या मुख्याध्यापकांनी दि. 27/09/2025 रोजी ग्रामपंचायतीला लेखी पत्र देऊन CCTV बंद असल्याची माहिती दिली होती. त्यानंतरही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नाही.
याबाबत RTI कार्यकर्ते व पत्रकार निलेश रहाटे यांनी एप्रिल 2026 मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक), गट शिक्षणाधिकारी, जिल्हाधिकारी तसेच संबंधित विभागांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. मात्र अनेक महिने उलटूनही विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक असलेली CCTV यंत्रणा अद्याप सुरू करण्यात आलेली नाही.
दरम्यान, या प्रकरणात संबंधित विभागांकडून एकमेकांकडे जबाबदारी ढकलली जात असल्याचे चित्र दिसत आहे. ग्रामसेवक व सरपंच यांचे म्हणणे आहे की, “ज्या एजन्सीने CCTV बसविले आहेत तीच एजन्सी वेळेवर सर्व्हिस देत नसल्याने दुरुस्ती रखडली आहे.” तर शिक्षण विभागातील अधिकारी “आम्ही ग्रामसेवकांना सूचना दिल्या आहेत,” असे सांगत आहेत. मात्र या सर्वांमध्ये विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न कायम प्रलंबित राहिला आहे.
शासनाने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी CCTV प्रणाली अनिवार्य केली असून, त्याच्या देखभालीची जबाबदारी संबंधित यंत्रणांवर आहे. तरीही अनेक महिन्यांपासून CCTV बंद असणे ही गंभीर बाब मानली जात असून, सार्वजनिक निधीतून उभारलेली सुरक्षा व्यवस्था निष्क्रिय असल्याने पालकांमध्येही नाराजी व्यक्त होत आहे.
आता या प्रकरणात संबंधित विभागांनी जबाबदारी निश्चित करून CCTV तात्काळ सुरू करावेत, तसेच दुर्लक्ष करणाऱ्या अधिकारी व संबंधित यंत्रणांवर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासन आणखी किती काळ मौन बाळगणार, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.













