खंडाळ्यात शेतकरी संवाद मेळाव्याचा धडाका; प्रथमेश गवाणकर व सहकाऱ्यांच्या पुढाकाराने कार्यक्रम यशस्वी
खंडाळा (प्रतिनिधी): श्री निलेश रहाटे
“जय जवान, जय किसान” या ब्रीदवाक्याला अनुसरून खंडाळा येथे परिसरातील शेतकरी व नागरिकांसाठी शेतकरी संवाद मेळाव्याचे भव्य आयोजन करण्यात आले. शेतीविषयक जनजागृती, आधुनिक शेती पद्धतींचा प्रसार आणि शासनाच्या विविध कृषी योजनांची माहिती थेट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश होता. सामाजिक कार्यकर्ते प्रथमेश गवाणकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या पुढाकारामुळे हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी प्रदीप भुवड, उप कृषी अधिकारी यांनी कृषी विभागाच्या विविध योजना सविस्तर समजावून सांगितल्या. विकास मेढे, मंडल कृषी अधिकारी यांनी कृषी प्रक्रिया उद्योग, फार्मर प्रोड्यूसर कंपनी आणि शेतकरी गटांच्या माध्यमातून उत्पन्नवाढीच्या संधींबाबत मार्गदर्शन केले. वर्ण नवलकर, मंडल कृषी अधिकारी यांनीही कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. उपस्थित शेतकऱ्यांना आधुनिक शेती तंत्रज्ञान, पीक व्यवस्थापन, जलसंधारण, सेंद्रिय शेती तसेच शासनाच्या अनुदान व कल्याणकारी योजनांची माहिती देण्यात आली. शेतकऱ्यांनीही विविध प्रश्न उपस्थित करून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेतले.
मेळाव्यात “सहकारातून समृद्धी” हे धोरण स्वीकारून शेती क्षेत्रात अधिक प्रभावी काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. शेती हा केवळ व्यवसाय नसून ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार करून शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
प्रथमेश गवाणकर व त्यांच्या सहकाऱ्यांच्या नियोजनबद्ध प्रयत्नांमुळे कार्यक्रम सुरळीत, शिस्तबद्ध आणि यशस्वीरीत्या पार पडल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली. परिसरातील शेतकऱ्यांमध्ये या उपक्रमामुळे सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून भविष्यातही अशा मार्गदर्शनपर कार्यक्रमांचे आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.












