रत्नागिरी जिल्हा बँकेच्या प्रगतीचे आमदार किरण सामंतांकडून कौतुक; ६,००० कोटींच्या व्यवसाय उद्दिष्टासाठी शुभेच्छा
अध्यक्ष, संचालक, अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कार्याचे गौरव; ग्रामीण भागातील डिजिटल बँकिंग विस्ताराचेही केले अभिनंदन
रत्नागिरी :
रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये केलेल्या उल्लेखनीय प्रगतीबद्दल आमदार किरण (भैय्या) सामंत यांनी समाधान व्यक्त करत अध्यक्ष, संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. तसेच बँकेच्या भविष्यातील वाटचालीसाठी शुभेच्छा देत ६,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट निश्चितपणे गाठण्याचा विश्वास व्यक्त केला आहे.
आमदार सामंत यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रात म्हटले आहे की, बँकेने आर्थिक प्रगतीबरोबरच आधुनिक आणि अद्ययावत बँकिंग सेवांचा विस्तार केला असून, ग्रामीण भागातील नागरिक आणि शेतकरी वर्गाला डिजिटल बँकिंगशी जोडण्यासाठी केलेले प्रयत्न अत्यंत कौतुकास्पद आहेत. बँकेच्या यशामध्ये हितचिंतक, ग्राहक, ठेवीदार, पतसंस्था, मच्छीमार, शेतकरी, सभासद तसेच अधिकारी आणि कर्मचारी यांचे मोलाचे योगदान असल्याचे त्यांनी नमूद केले.
बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्या प्रभावी नेतृत्वाखाली संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी यांनी सुयोग्य नियोजन, उत्कृष्ट समन्वय आणि समर्पित भावनेने काम केल्यामुळेच ही उल्लेखनीय प्रगती शक्य झाल्याचे आमदार सामंत यांनी म्हटले आहे.
येत्या काळात बँकेने ६,००० कोटी रुपयांच्या व्यवसायाचे उद्दिष्ट निश्चित केले असून, हे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी संपूर्ण संचालक मंडळ, अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला त्यांनी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.
राज्यातील सहकारी बँकिंग क्षेत्रात रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आदर्श आणि अग्रगण्य स्थान अधिक बळकट करावे, तसेच प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत राहावा, अशा सदिच्छाही आमदार किरण सामंत यांनी व्यक्त केल्या. त्यांच्या या प्रोत्साहनपर पत्राबद्दल बँकेच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली आहे.









