मुलगी अरण्याच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी येथे शैक्षणिक साहित्याचे वाटप!
दिपक जोशी यांचा सामाजिक बांधिलकीचा उपक्रम; विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर फुलले आनंदाचे हास्य

तवसाळ : मुलीच्या वाढदिवसाचे औचित्य साधून समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी जपत श्री. दिपक जोशी यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तवसाळ बाबरवाडी येथील सर्व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले.
कु. अरण्या दिपक जोशी हिच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या उपक्रमातून विद्यार्थ्यांना शालेय व शैक्षणिक साहित्य भेट देण्यात आले. वाढदिवसाचा आनंद केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्याचा एक सुंदर प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. विद्यार्थ्यांनी दिपक जोशी यांचे मनापासून आभार मानले. तसेच शाळेतील शिक्षक साळवी गुरुजी यांनी दिपक जोशी यांचा सत्कार करून या सामाजिक उपक्रमाबद्दल त्यांचे आभार व्यक्त केले.
आजच्या काळात वाढदिवस विविध प्रकारे साजरे केले जातात; मात्र आपल्या आनंदाच्या क्षणाला सामाजिक कार्याची जोड देत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी हातभार लावणे ही निश्चितच कौतुकास्पद बाब आहे.
‘वाढदिवसाचा आनंद स्वतःपुरता न ठेवता गरजू विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलवणे, हीच खरी सामाजिक बांधिलकी!’
दिपक जोशी यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाचे शाळा व ग्रामस्थांकडून कौतुक होत आहे.













