रशियाने अमेरिकेच्या शस्त्रसंधीच्या प्रस्तावाला केराची टोपली?
डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रतिनिधींना दिला नकार!
मॉस्को: मागील तीन वर्षांपासून सुरू असलेल्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यांनी युक्रेनला शस्त्रसंधी मान्य करण्यास राजी केले असून, रशियासोबत चर्चा सुरू करण्यासाठी आपले प्रतिनिधी मॉस्कोला पाठवले. मात्र, रशियाने या प्रस्तावाला ठेंगा दाखवल्याची माहिती समोर येत आहे.
रशियाचा ठाम विरोध
अमेरिकेच्या प्रतिनिधींनी रशियाला 30 दिवसांची युद्धविराम शस्त्रसंधी करण्याचा प्रस्ताव दिला आहे. या प्रस्तावानुसार, युक्रेन आणि रशियाने पुढील एक महिना युद्ध थांबवावे, जेणेकरून चर्चेसाठी योग्य परिस्थिती निर्माण होईल. युक्रेनने या प्रस्तावाला होकार दिला असला तरी रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मात्र या योजनेवर आक्षेप घेतला आहे.
रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, “अशी शस्त्रसंधी केवळ युक्रेनच्या फायद्याची असेल. या काळात युक्रेन आपली लष्करी ताकद पुन्हा निर्माण करू शकते आणि नंतर आमच्यावरच हल्ला करू शकते.” त्यामुळे रशिया या प्रस्तावावर अद्याप सकारात्मक नाही.
डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा
रशियाच्या या भूमिकेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर नवे तणाव निर्माण झाले आहेत. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी रशियाला स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर त्यांनी युद्धविराम मान्य केला नाही, तर त्यांना “विनाशकारी” आर्थिक निर्बंधांचा सामना करावा लागू शकतो.
युद्धाचा तिढा कायम
युद्ध थांबवण्यासाठी रशिया, युक्रेन आणि अमेरिका यांच्यातील चर्चा महत्त्वाची ठरणार आहे. रशिया जर शस्त्रसंधीला नकार देत राहिला, तर युक्रेनमधील संघर्ष आणखी तीव्र होऊ शकतो, अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. पुढील काही दिवसांत मॉस्कोमधील चर्चेच्या निकालावर संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहणार आहे.