राज्यात शाळांच्या वेळेत बदल: उष्णतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय
नवी मुंबई (मंगेश जाधव) – राज्यात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश संबंधित विभागांनी जारी केले आहेत.
प्राथमिक विभागाचे शिक्षण संचालक शरद गोसावी आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालक संपत सूर्यवंशी यांनी स्वतंत्र आदेश काढले असून, यानुसार शाळांच्या वेळांमध्ये सुधारणा करण्यात आली आहे. नवीन वेळेनुसार:
प्राथमिक शाळा: सकाळी ७:०० ते ११:१५
माध्यमिक शाळा: सकाळी ७:०० ते ११:४५
राज्यात उन्हाच्या तीव्रतेचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. उन्हाच्या झळांमुळे होणाऱ्या उष्माघात, थकवा आणि अन्य आरोग्यविषयक समस्यांपासून विद्यार्थ्यांचे संरक्षण करण्यासाठी वेळ बदलण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाने दिले महत्वाचे निर्देश
शिक्षण विभागाने सर्व शाळांना या नव्या वेळापत्रकाचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी थंड पाण्याची व्यवस्था, स्वच्छता आणि सुरक्षिततेबाबत विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना उन्हाच्या कडाक्याच्या वेळी शाळेच्या बाहेर जाण्याची गरज भासणार नाही, तसेच त्यांचे आरोग्य अबाधित राहील. पालक आणि शिक्षक संघटनांनी या निर्णयाचे स्वागत केले असून, हा बदल तातडीने अंमलात येणार आहे.