???? अक्षय शिंदे चकमक प्रकरण : मृत्यूसाठी जबाबदार पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करा – उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश!
♦️ एसआयटी स्थापन करण्याचे निर्देश, सरकारचा दावा फेटाळला
मुंबई : बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या कोठडीतील मृत्यूस जबाबदार असलेल्या पाच पोलिसांवर गुन्हा दाखल करा आणि प्रकरणाच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करा, असे आदेश उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य सरकारला दिले. न्यायालयाने दिलेल्या आदेशामुळे या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
दंडाधिकाऱ्यांच्या चौकशी अहवालानुसार, ठाणे गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे, पोलीस हवालदार अभिजीत मोरे व हरीश तावडे, आणि पोलीस वाहन चालक सतीश खाटळ या पाच पोलिसांना शिंदेच्या मृत्यूस जबाबदार ठरवले गेले आहे. मात्र, या अहवालावर आधारित गुन्हा नोंदवण्यास सरकारकडून टाळाटाळ होत असल्याचे निरीक्षण करत न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती नीला गोखले यांच्या खंडपीठाने सरकारवर ताशेरे ओढले.
न्यायालयाने नमूद केले की, हे प्रकरण बंद करणे त्यांच्यासाठी सोपे होते कारण अक्षय शिंदे यांच्या पालकांनीही प्रकरण मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु, “घटनात्मक न्यायालय म्हणून आम्ही या प्रकाराकडे दुर्लक्ष करू शकत नाही,” असे स्पष्ट करत न्यायालयाने संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
प्रकरणाच्या पुढील तपासासाठी सह पोलीस आयुक्त लख्मी गौतम यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन करण्यात यावी आणि राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने (CID) आतापर्यंतच्या तपासाची सर्व कागदपत्रे SIT कडे सोपवावीत, असे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
सरकारचा दावा फेटाळला
शिंदे याच्या मृत्यूनंतर कायद्यानुसार दंडाधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात आली. त्यामध्ये चकमक बनावट असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला होता आणि पोलिसांच्या स्वसंरक्षणाच्या दाव्यांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. सरकारने मात्र या प्रकरणी CID तपासानंतरच गुन्हा दाखल करायचा की नाही, याचा निर्णय घेऊ असे म्हणत अहवालाच्या आधारे तत्काळ कारवाई करण्यास विरोध दर्शवला. मात्र, न्यायालयाने सरकारचा हा दावा फेटाळून अहवालाच्या आधारे गुन्हा नोंदविणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट केले.
या प्रकरणात उपस्थित कायदेशीर मुद्द्यांवर न्यायालयाला सहकार्य करण्यासाठी वरिष्ठ वकील मंजुळा राव यांची न्यायमित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
—
#AksayShindeCase #MumbaiHighCourt #PoliceCustodyDeath #FakeEncounter #SITInvestigation #JusticeForAkshayShinde #PoliceAccountability #BreakingNews #MaharashtraNews #LegalNews