गुहागर काँग्रेसचे माजी अध्यक्ष भाजपमध्ये?
मिलिंद चाचे यांच्या प्रवेशाच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ; भाजपला मिळणार ‘नवा चेहरा’?
गुहागर | सुजित सुर्वे प्रतिनिधी
गुहागर तालुक्यातील राजकारणात पुन्हा एकदा उलथापालथ होण्याची शक्यता आहे. तालुका काँग्रेसचे माजी अध्यक्ष श्री. मिलिंद आत्माराम चाचे लवकरच भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार, अशा जोरदार चर्चा सध्या सुरू आहेत. नुकतीच त्यांनी भाजपचे वरिष्ठ नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री श्री. अशोकराव चव्हाण यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीनंतर त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना अधिकच बळ मिळाले आहे.
मिलिंद चाचे हे सुसंस्कारित, अभ्यासू आणि सुस्वभावी नेतृत्व म्हणून ओळखले जातात. पडवे जिल्हा परिषद गटासह गुहागर परिसरात त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. अनेक वर्षे त्यांनी काँग्रेसमध्ये कार्य केले असून, स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला आहे.
गुहागर तालुक्यात भाजपला गेल्या काही वर्षांपासून मजबूत नेतृत्वाचा अभाव जाणवत होता. पारंपरिक नेतृत्वाबरोबरच नव्या दमाच्या, कार्यक्षम नेतृत्वाची गरज भाजपला होती. अशा वेळी मिलिंद चाचे यांच्यासारखा सक्रिय आणि लोकप्रिय चेहरा पक्षात आल्यास, भाजपला गावपातळीपासून जिल्हा पातळीपर्यंत नवा आत्मविश्वास मिळू शकतो.
खात्रीलायक सूत्रांच्या माहितीनुसार, ते येत्या काही दिवसांत औपचारिक पक्षप्रवेश करणार आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम होण्याची शक्यता असून, स्थानिक राजकारणाला त्यामुळे नवे वळण मिळेल.
विशेष म्हणजे, मिलिंद चाचे यांनी अद्याप अधिकृतपणे काही वक्तव्य केले नसले तरी, त्यांच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आणि तयारी दोन्ही दिसून येत आहे.
#गुहागर #मिलिंदचाचे #भाजपप्रवेश #नवाचहरा #राजकारण #पडवेगट #रत्नागिरीवर्ताहर