रुग्णाकडून अनामत रक्कम घेणे थांबवा; पिंपरीतील ६५० खासगी रुग्णालयांना महापालिकेची नोटीस!
गर्भवती रुग्णाकडून अनामत मागितल्याच्या प्रकरणानंतर महापालिकेचे कठोर पाऊल; नियमभंग केल्यास परवाना रद्द करण्याचा इशारा
पिंपरी : दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती रुग्णाकडून अनामत रक्कम मागितल्याच्या प्रकरणानंतर पिंपरी-चिंचवड महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. शहरातील ६५० खासगी रुग्णालयांना नोटीस बजावत यापुढे कोणत्याही रुग्णाकडून अनामत रक्कम मागू नये, अशी सक्त सूचना देण्यात आली आहे. अन्यथा संबंधित रुग्णालयांचा परवाना रद्द करण्यात येईल, असा इशाराही पालिकेने दिला आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाने बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार परवाना घेतलेल्या सर्व ६५० नोंदणीकृत रुग्णालयांना हे परिपत्रक जारी केले आहे. अतितत्काळ व तत्काळ उपचारासाठी आलेल्या रुग्णांवर सर्वप्रथम उपचार सुरू करणे बंधनकारक आहे. अनामत रकमेच्या मागणीमुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होतो, हे लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.
या नोटिशींमध्ये रुग्णालयांना खुलासा मागवण्यात येणार असून, नियम मोडल्यास दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. पुनःपुन्हा नियमभंग झाल्यास संबंधित रुग्णालयाचा परवाना थेट रद्द केला जाईल, अशी माहिती महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.
#पिंपरीचिंचवड #रुग्णालय #अनामतरक्कम #महापालिका #डॉगोफणे #आरोग्यनियम #BreakingNews