पाटपन्हाळे महाविद्यालयात महात्मा फुले जयंती उत्साहात साजरी
प्रा. गजभिये यांचे प्रेरणादायी विचार; विद्यार्थ्यांना पुस्तक वाचनाची साद
तळवली (मंगेश जाधव) –
गुहागर तालुक्यातील पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या पाटपन्हाळे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात महात्मा जोतीराव फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्यावतीने आयोजित या कार्यक्रमात प्र. प्राचार्य प्रा. लंकेश गजभिये यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.
या वेळी प्रा. गजभिये यांनी आपल्या मनोगतातून जोतीराव फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्यावर प्रकाश टाकत विद्यार्थ्यांना आजच्या युगात वाचन संस्कृती जोपासण्याचा संदेश दिला. “मोबाइल आणि टी.व्ही. पासून काही वेळ दूर राहून दररोज एखादं चांगलं पुस्तक वाचणं आवश्यक आहे. ग्रंथालयाचा अधिकाधिक वापर करून आपण फुलेंच्या कार्याला खरी मानवंदना देऊ शकतो,” असे ते म्हणाले.
कार्यक्रमास सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जालिंदर जाधव, महिला विकास कक्ष प्रमुख प्रा. सौम्या चौघुले, ग्रंथपाल श्री. धनंजय गुरव, डॉ. दिनेश पारखे, प्रा. कांचन कदम, प्रा. सुभाष घडशी, ग्रंथालय परिचर श्री. पर्शुराम चव्हाण तसेच महाविद्यालयीन विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. जालिंदर जाधव यांनी केले तर आभार प्रा. सुभाष घडशी यांनी मानले.
हॅशटॅग्स:
#महात्मा_फुले_जयंती #पाटपन्हाळे_महाविद्यालय #गुहागर_घटना #शैक्षणिककार्यक्रम #विद्यार्थीप्रेरणा