काताळे जलजीवन मिशन योजनेच्या अर्धवट कामावर ग्रामस्थांचा संताप
काताळे ग्रामपंचायतीतील पाणीपुरवठा योजना अपूर्ण; निकृष्ट कामाची चौकशी व्हावी अशी मागणी
काताळे (ता. गुहागर):
केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत कातळे नवानगर परिसरातील मुस्लिम मोहल्ला, कोंडवाडी बौद्धवाडी आणि खारवीवाडी यामधील पाणीपुरवठा योजनेचे काम गेली दोन ते तीन वर्षे अर्धवट अवस्थेत असून, स्थानिक ग्रामस्थांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. योजनेत निकृष्ट दर्जाचे काम झाले असून, ठेकेदार आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ही योजना अपयशी ठरली आहे, असा आरोप ग्रामपंचायत सदस्य मधुकर कृष्णा अजगोलकर यांनी केला आहे.
या योजनेसाठी कोणतीही पूर्वकल्पना न देता ग्रामपंचायतीच्या समन्वयाशिवाय काम सुरू करण्यात आले. त्यामुळे अनेक ठिकाणी चुकीच्या पद्धतीने व अर्धवट काम झाल्याने ही योजना टिकण्याची शक्यता कमी असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
“ही योजना खऱ्या अर्थाने जनहिताची आहे की काही अधिकाऱ्यांची व ठेकेदारांची फक्त व्यवहारपूर्ती, हे स्पष्ट होत नाही,” असेही अजगोलकर यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.
ग्रामस्थांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या योजनेची सखोल चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी आणि योजना लवकरात लवकर पूर्णत्वास न्यावी, अशी मागणी केली आहे. सध्या चारही वाड्यांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई असून, सर्वसामान्य नागरिकांना याचा फटका बसतो आहे.
गुहागर तालुक्यातही अनेक ग्रामपंचायत च्या कार्यक्षेत्रातील जलजीवन मिशन आणि इतर योजनेतील पाणी योजना या बारगळल्या आहेत तर काही योजना या चौकशी प्रक्रियेत आहेत. हे सर्व काही अधिकारी यांचे मर्जीने होत आहे अशी जनतेतून चर्चा आहे. काताळे ग्रामपंचायत चे शेजारी असणाऱ्या निर्मल ग्रामपंचायत पडवे ची राष्ट्रीय पेयजल योजना आणि नवीन बांधलेला जलजीवन मिशन योजने मधून बांधलेला बंधारा ही बोगस पद्धतीने काम केल्याचं तेथील ग्रामस्थांचा आरोप आहे. सध्या या योजनेच्या कामाची खेड कोर्टात फेर चौकशी ची केस सुरू असून लवकर सत्य बाहेर येईल. असा विश्वास येथील जनतेला आहे. |
काही अधिकारी आणि ठेकेदार यांच्या मूकसंमतीने च शासनाचा निधी आज चुकीच्या पद्धतीने वापर केला जातोय हे प्रशासनाच्या हे कधी लक्षात येईल?
—
#जलजीवनमिशन #कातळेग्रामपंचायत #पाणीटंचाई #गुहागर #रत्नागिरीबातम्या #WaterCrisis #KonkanNews #PublicDemand #ग्रामविकास