डॉ. होमी भाभा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता आयुष चव्हाणचा अरुंधती पाध्ये प्रशालेत गौरव
कोल्हापूर विभागातून पाच सुवर्णपदक विजेत्यांपैकी एक ठरलेल्या आयुषचा सन्मान; विविध शैक्षणिक स्पर्धांतील यशामुळे गौरवाचा वर्षाव
तळवली (मंगेश जाधव) – देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या स्व. अरुंधती अरुण पाध्ये इंग्लिश मिडीयम स्कूलमधील इ. ६वीतील विद्यार्थी आयुष हेमंत चव्हाण याचा नुकताच विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत कोल्हापूर विभागातून सुवर्णपदक पटकावल्याबद्दल आणि इतर विविध स्पर्धांतील उल्लेखनीय कामगिरीमुळे हा गौरव करण्यात आला. या छोटेखानी समारंभात संस्थाध्यक्ष सदानंद भागवत, डॉ. चंद्रशेखर केदारी, ॲड. वेदा प्रभुदेसाई, नितीन शेडगे, मुख्याध्यापिका सोनाली नारकर आणि दीक्षा खंडागळे यांनी उपस्थित राहून आयुषचा सत्कार केला.
बृहन्मुंबई विज्ञान अध्यापक मंडळाद्वारे आयोजित ४४ व्या होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेत यावर्षी सुमारे ८८,८०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. कोल्हापूर विभागातून ५,००० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, मात्र अंतिम सुवर्णपदकासाठी केवळ ५ विद्यार्थी निवडले गेले, त्यात आयुष चव्हाणचा समावेश आहे.
आयुषने या स्पर्धेसाठी स्वयंपाकघरातील टाकाऊ वस्तूंपासून खतनिर्मिती करून व्हर्टिकल गार्डनच्या माध्यमातून शाश्वत कृषी उत्पादनावर संशोधन केले. त्याच्या या नाविन्यपूर्ण कल्पनेने परीक्षकांना प्रभावित केले. या संशोधनाचा उद्देश म्हणजे शहरांतील अन्नसुरक्षा आणि आरोग्यदायी भाज्यांचे उत्पादन कमी जागेत व कमी खर्चात शक्य करणे.
शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये आयुषने ५वी शिष्यवृत्ती परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातून तृतीय, संगमेश्वर तालुक्यातून प्रथम क्रमांक मिळवला. विज्ञानरंजन परीक्षेत जिल्ह्यातून द्वितीय आणि मंथन परीक्षेत कोकण विभागातून तृतीय क्रमांक पटकावला. बी.डी.एस. परीक्षेत सुवर्णपदक विजेता ठरला. नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षेतही तो यशस्वी झाला आहे.
पाध्ये प्रशालेतून दरवर्षी दिला जाणारा ‘बेस्ट स्टुडन्ट ऑफ द इयर’ हा पुरस्कार आयुषने इ. १लीपासून इ. ६वीपर्यंत सातत्याने मिळवला आहे. संस्थाध्यक्ष सदानंद भागवत यांनी त्याला भेटवस्तू देऊन गौरविले आणि उपस्थित विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. यावेळी आयुषने आपले मनोगतही व्यक्त केले.
आयुषच्या यशामध्ये त्याचे पालक – आई गोकर्णा हेमंत चव्हाण आणि वडील प्रा. डॉ. हेमंत चव्हाण यांचे मोठे योगदान आहे. शाळेतील वर्गशिक्षिका योगिनी केतकर, विज्ञान शिक्षिका मेघा संकपाळ यांच्यासह डॉ. प्रताप नाईकवाडे, डॉ. सागर संकपाळ, डॉ. रणजीत बनसोडे, डॉ. मीरा काळे आणि राहुल शिंदे सर यांचे मार्गदर्शनही त्याला लाभले.
शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आयुषच्या यशाचे अभिनंदन करत त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
हॅशटॅग्स:
#AyushChavan #HomiBhabhaGoldMedalist #FuturScientist #VerticalGarden #SustainableFarming #ChildScientist #RatnagiriTalent #DevrukhSchool #STEMInnovation #BestStudentAward