पत्रकारांच्या हक्कांसाठी ऐतिहासिक लढा! – संदीप महाजन यांच्या संघर्षाला न्यायालयीन आधार
जळगाव जिल्ह्यातील पत्रकार हल्ला प्रकरणात पहिल्यांदाच पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा व चार्जशीट; पत्रकारांसाठी नवा टप्पा
“पत्रकारांवरील हल्ल्याला न्यायाची झुंज : संदीप महाजन यांच्या संघर्षाला न्यायालयीन मान्यता”
भडगाव (गुरुदत्त वाकदेकर) :: निर्भय पत्रकारितेचा लौकिक राखत अन्यायाविरुद्ध न डगमगता लढा देणारे पत्रकार संदीप महाजन यांच्या संघर्षाला अखेर न्यायालयीन मान्यता लाभली आहे. पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल होऊन चार्जशीट सादर होण्याची जळगाव जिल्ह्यातील ही पहिलीच घटना ठरली आहे.
गोंडगाव घेथे येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचारानंतर निर्घृण हत्या झाल्याच्या घटनेमुळे संपूर्ण जिल्हा हादरला. याविरोधात ४ ऑगस्ट २०२४ रोजी भडगाव तहसीलवर ‘झुंज’ वृत्तपत्राच्यावतीने मुकमोर्चा निघाला. यानंतर महाजन यांनी सरकारच्या भूमिकेवर “मुख्यमंत्र्यांची चमकोगिरी” ही बातमी प्रसिद्ध केली. त्यामुळे संतप्त आमदार किशोर पाटील यांनी त्यांना फोनवरून अश्लील भाषेत धमकी दिली, जी क्लिप त्यांनी माध्यमांसमोरही मान्य केली.
९ ऑगस्ट रोजी महाजन यांच्यावर हल्ला झाला. व्हिडीओ पुरावा असूनही पोलिसांनी नॉन-कॉग्निझेबल गुन्हा नोंदवून प्रकरण थांबवण्याचा प्रयत्न केला. या अन्यायाविरुद्ध महाजन यांनी औरंगाबाद खंडपीठात आणि नंतर पाचोरा व जिल्हा सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्या. १४ नोव्हेंबर २०२४ रोजी सत्र न्यायाधीश आर.एस. पवार यांनी विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर डीवायएसपी धनंजय वेरूळे यांच्या तपासानंतर चार आरोपींवर चार्जशीट दाखल करण्यात आली. आमदार पाटील यांच्यावरील चौकशी उच्च न्यायालयात सुरू आहे.
या लढ्यात अॅड. परेश पाटील, अॅड. मंगला वाघे व अॅड. हर्षल रणधिर यांचे योगदान मोठे ठरले. प्रेस क्लब, मराठी पत्रकार संघासह १६ पत्रकार संघटना त्यांच्या पाठिशी उभ्या राहिल्या.
“हा लढा व्यक्तिसाठी नव्हता, तर अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी होता,” अशी भावना महाजन यांनी निकालानंतर व्यक्त केली.
हा निकाल महाराष्ट्रात पत्रकार संरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीसाठी एक मैलाचा दगड ठरला आहे.
हॅशटॅग्स:
#पत्रकारसंरक्षणक