प्राचार्य महावीर थरकार यांना
क्रांतिबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान
तळवली(मंगेश जाधव)
पाटपन्हाळे एज्युकेशन सोसायटीच्या न्यू इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय तळवलीचे प्राचार्य महावीर आण्णापा थरकार यांना कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी यांच्या कडून संविधानाचा अमृत महोत्सव उपक्रम अंतर्गत “क्रांतिबा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार २०२५” देऊन जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिरादार यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ व आकर्षक स्मृतीचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक पतपेढी च्या सभागृहात रविवार दि. २० एप्रिल रोजी कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा रत्नागिरी तर्फे आयोजित जिल्हा मेळाव्यात प्राचार्य महावीर थरकार यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रसंगी विचार मंचावर कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष आकाश तांबे, रत्नागिरी जिल्हा कोषागार अधिकारी प्रविण बिरादार, कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे विद्यमान जिल्हाध्यक्ष प्रदीप वाघोदे, माजी जिल्हाध्यक्ष मिलिंद कदम, राज्य उपाध्यक्ष बाजिराव प्रज्ञावंत, माध्यमिक पतपेढीचे संचालक, कार्यकारिणी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. त्यांनी मार्गदर्शनपर विचार व्यक्त करताना कास्ट्राईब संघटनेचे सक्रिय सदस्य, पदाधिकारी तसेच उच्च पदावर कार्यरत तसेच पदोन्नती मिळालेले प्राचार्य, मुख्याध्यापक तसेच विशेष प्राविण्य मिळविलेले शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे विशेष अभिनंदन केले. सर्वांनी संघटना वाढीसाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले.
जिल्हा मेळाव्यासाठी जिल्हा कार्यकारिणीचे सर्व पदाधिकारी, सर्व तालुक्यांचे अध्यक्ष, सचिव व इतर पदाधिकारी, पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती व हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या वेळी उपस्थित सर्वांसाठी दुपारी स्वादिष्ठ स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. आभारा नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

Author: Team Ratnagiri Vartahar
Official Ratnagiri vartahar Media creators