लांजा येथे अत्याधुनिक भू-प्रणाम केंद्राचे भव्य उद्घाटन

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लांजा येथे अत्याधुनिक भू-प्रणाम केंद्राचे भव्य उद्घाटन

 

भूमी अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरणाची वाटचाल; नागरिकांसाठी विविध डिजिटल सेवा आता एका छताखाली

 

तळवली (मंगेश जाधव)

लांजा येथे भूमी अभिलेख विभागांतर्गत सुसज्ज व अत्याधुनिक सोयी-सुविधांनीयुक्त भू-प्रणाम केंद्राचे उद्घाटन भूमी अभिलेख, कोकण विभागाचे उपसंचालक अनिल माने यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या विविध सेवा आता नव्या भू-प्रणाम केंद्रातून उपलब्ध होणार असून, जनतेने याचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. माने यांनी उद्घाटनप्रसंगी केले.

 

नवीन भू-प्रणाम केंद्रात अभ्यागतांसाठी सुसज्ज बैठक व्यवस्था, स्वच्छ पिण्याचे पाणी आणि प्रतिक्षालय आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना अधिक सुसंस्कृत आणि सुलभ सेवा अनुभवता येणार आहे.

 

भूमी अभिलेख विभागाच्या आधुनिकीकरण उपक्रमांतर्गत राज्यभर दोन टप्प्यांत एकूण ३० भू-प्रणाम केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. या केंद्रांमध्ये संगणकीकृत मिळकत पत्रिका, मिळकत पत्रिकेवरील फेरफार, ई-मोजणी व्हर्जन २.० द्वारे मोजणी नकाशे, डिजीटल स्वाक्षरी केलेले नकाशे आदी सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या आहेत. तसेच ईपीसीआयएस प्रकल्पांतर्गत फेरफार नोंदवही उतारा, परिशिष्ट अ व ब, नमुना नं. ९ व १२ ची नोटीस, अर्जाची पोच, रिजेक्शन पत्रे, निकाली पत्रे व विवादग्रस्त नोंदवही उतारे यांसारखे विविध संगणकीकृत अभिलेखही दिले जाणार आहेत. या सर्व सेवांसाठी निश्चित दरही जाहीर करण्यात आले आहेत.

 

या कार्यक्रमास जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख सचिन इंगळी, उप अधीक्षक भूमी अभिलेख लांजा नरेंद्र गोरे, नगर भूमापन अधिकारी सोनल काळे यांच्यासह भूमी अभिलेख विभागातील सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

#लांजा #भूप्रणामकेंद्र #भूमीअभिलेखविभाग #आधुनिकीकरण #RatnagiriNews

 

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...