वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीपुढे गुजरातला निष्प्रभ; राजस्थानचा ८ विकेट्सने विजय

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

वैभव सूर्यवंशीच्या आक्रमक खेळीपुढे गुजरातला निष्प्रभ; राजस्थानचा ८ विकेट्सने विजय

banner

 

मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : वैभव सूर्यवंशीचे विक्रमी शतक आणि यशस्वी जयस्वालच्या अर्धशतकाच्या जोरावर, राजस्थान रॉयल्सने सोमवारी त्यांच्या घरच्या मैदानावर सवाई मानसिंग स्टेडियमवर गुजरात टायटन्सचा आठ विकेट्सने पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना गुजरातने २० षटकांत चार गडी गमावून २०९ धावा केल्या. राजस्थानने हे लक्ष्य १५.५ षटकांत २ विकेट गमावून पूर्ण केले.

या सामन्यात वैभवने शानदार शतक झळकावले जे त्याचे आयपीएलमधील पहिलेच शतक आहे. त्याने ३८ चेंडूत सात चौकार आणि ११ षटकारांसह १०१ धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान त्याने अनेक विक्रम केले. तो आयपीएलमध्ये अर्धशतक आणि शतक ठोकणारा सर्वात तरुण फलंदाज बनला आहे.

वैभवने १७ चेंडूत अर्धशतक आणि ३५ चेंडूत शतक झळकावले. तो टी-२० मध्ये शतक करणारा सर्वात तरुण फलंदाज ठरला आहे. याशिवाय, तो आयपीएलमध्ये सर्वात जलद शतक करणारा भारतीय फलंदाजही बनला आहे.

मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना, राजस्थानने वैभव आणि यशस्वीच्या मदतीने चांगली सुरुवात केली. वैभवने अ‍ॅक्सिलरेटरवर पाऊल ठेवताच, यशस्वी शांत झाला. त्याने वैभवला संधी दिली आणि डावखुऱ्या फलंदाजाने त्याचा पुरेपूर फायदा घेतला. प्रथम त्याने १७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. हे या हंगामातील सर्वात जलद अर्धशतक आहे आणि आयपीएलमध्ये राजस्थानसाठी दुसरे सर्वात जलद अर्धशतक आहे. यशस्वीने १३ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे.

अर्धशतक झळकावल्यानंतर तो अधिक आक्रमक झाला. त्याने गुजरातच्या एकाही गोलंदाजाला सोडले नाही. रशीद खानपासून ते मोहम्मद सिराज आणि प्रसीद कृष्णापर्यंत सर्वांची त्याने धुलाई केली. वैभवने १० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या करीम जनतवर हल्ला केला आणि ३० धावा काढल्या. या षटकात त्याने तीन षटकार आणि तितकेच चौकार मारले. करीमचा हा आयपीएलमधील पहिला सामना होता जो तो कधीही विसरणार नाही. आयपीएल २०२५ मधील आतापर्यंतचं हे सर्वात महागडं षटक ठरलं आहे.

१२ व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर कृष्णाने वैभवचा डाव संपवला. वैभवने त्याच्या डावात ११ षटकार मारले. यासह, तो आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज बनला आहे. या बाबतीत तो मुरली विजयसोबत संयुक्तपणे पहिल्या क्रमांकावर आहे. यशस्वीसोबत त्याने १६६ धावांची भागीदारी केली जी राजस्थानसाठी आयपीएलमध्ये कोणत्याही विकेटसाठीची सर्वोच्च भागीदारी आहे.

वैभवच्या जाण्यानंतर, यशस्वीने जबाबदारी घेतली आणि अर्धशतक पूर्ण केले. तिसऱ्या क्रमांकावर आलेला नितीश राणा लवकर तंबूमध्ये परतला. त्याने दोन चेंडूत फक्त चार धावा काढल्या. कर्णधार रियान परागसोबत त्याने संघाला विजयाकडे नेले. यशस्वीने ४० चेंडूंत नऊ चौकार आणि दोन षटकारांसह नाबाद ७० धावा केल्या. पराग १५ चेंडूत ३२ धावा करून नाबाद राहिला.

याआधी, पुन्हा एकदा गुजरातच्या टॉप-३ फलंदाजांनी चांगली कामगिरी केली. साई सुदर्शनने कर्णधार शुभमन गिलसोबत ९३ धावा जोडल्या. सुदर्शनला त्याचे अर्धशतक पूर्ण करता आले नाही आणि तो ३९ धावा करून बाद झाला. त्यानंतर गिल आणि बटलरने डावाची जबाबदारी घेतली. दोघांनीही धावसंख्या १६७ धावांपर्यंत नेली. गिल शतक पूर्ण करण्यापूर्वीच बाद झाला. त्याने ५० चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने ८४ धावा केल्या. बटलरने २६ चेंडूत तीन चौकार आणि चार षटकारांसह ५० धावांची नाबाद खेळी केली.

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators

Leave a Comment

आणखी वाचा...