जलजीवन योजना “जैसे थे” स्थितीत; गुहागरात कामे अपूर्ण, मनसेचा प्रशासनाला इशारा
गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये जलजीवन योजनेची अंमलबजावणी अपूर्ण; ठेकेदारांवर कारवाईची मागणी, मे महिन्यात पाण्यासाठी ग्रामस्थांची होणार धावपळ
बातमी
आबलोली (संदेश कदम) –
शासनाची महत्वाकांक्षी जलजीवन योजना गुहागर तालुक्यात अनेक ठिकाणी अर्धवट स्थितीतच आहे. वेळोवेळी पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. गुहागर विधानसभा क्षेत्राचे मनसे उपजिल्हाध्यक्ष विनोद जानवळकर यांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की, ही कामे त्वरित पूर्ण न झाल्यास मनसे तीव्र आंदोलन छेडेल.
जानवळकर यांनी दिलेल्या निवेदनात स्पष्ट केले आहे की, “तालुक्यात बहुतांश ठिकाणी जलजीवन योजनेची कामे थांबलेली आहेत. पाईपलाइन फक्त टाकण्यात आली असून, पाण्याचा स्रोत जोडलेलाच नाही. ठेकेदारांनी आपली बिलं उचलून घेतली, पण प्रत्यक्षात कामे अपूर्ण आहेत.”
या बेजबाबदार कामामुळे शासनाचा निधी वाया जात असून, गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी अजूनही वणवण करावी लागत आहे. मे महिन्यात ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याची शक्यता असल्याने मनसेने प्रशासनाला इशारा दिला आहे की, योजनेबाबतची जबाबदारी निश्चित करून संबंधित अधिकाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर कारवाई करावी.
“जर वेळेत उपाययोजना झाली नाही, तर मनसे याबाबत आक्रमक भूमिका घेऊन रस्त्यावर उतरेल,” असा इशाराही जानवळकर यांनी आपल्या निवेदनात दिला आहे.
हॅशटॅग्स:
#जलजीवनयोजना #गुहागर #मनसे #पाणीटंचाई #ग्रामविकास #मनसेचाआंदोलनइशारा #RatnagiriNews #गुहागरबातमी
फोटो