मत्स्य व्यवसायास कृषी दर्जा लागू; मच्छीमारांसाठी सवलतींचा वर्षाव सुरू
वीज, कर्ज, विमा, सौर ऊर्जा यांसह विविध योजनांचा लाभ आता मत्स्य व्यवसायिकांनाही मिळणार; शासन निर्णय शुक्रवारीपासून अंमलात
मुंबई – महाराष्ट्रातील मच्छीमार आणि मत्स्य व्यवसायिकांसाठी राज्य सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. शुक्रवारीपासून मत्स्य व्यवसायाला कृषी दर्जा देण्यात आला असून, याअंतर्गत कृषी क्षेत्राला मिळणाऱ्या विविध सवलती आता मत्स्य व्यवसाय क्षेत्रालाही लागू होतील.
राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या पाठपुराव्यानंतर मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली होती आणि शासन निर्णय तातडीने जारी करण्यात आला आहे. या निर्णयामुळे राज्यातील मच्छीमार, मत्स्यकास्तकार, मत्स्य उत्पादक, मत्स्य व्यवस्थापन व साठवणूक क्षेत्राशी संबंधित घटकांना कृषी प्रमाणे सवलती मिळतील.
या सवलतींमध्ये सवलतीच्या दरातील वीज पुरवठा, कृषी दराने बँक कर्ज, किसान क्रेडिट कार्डचा लाभ, कमी हप्त्याच्या विमा योजनांचा समावेश आहे. तसेच सौर ऊर्जा योजनांचा लाभही मत्स्य व्यवसायिकांना मिळणार आहे.
विशेष म्हणजे या निर्णयात मत्स्य व्यवसायाशी संबंधित संज्ञा प्रथमच स्पष्टपणे परिभाषित करण्यात आल्या आहेत, ज्यामुळे शासन योजनांचा अचूक लाभ संबंधित घटकांपर्यंत पोहोचवता येईल.
या निर्णयामुळे राज्यात मत्स्य उत्पादनात वाढ होणार असून रोजगार निर्मितीला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त होत आहे. महाराष्ट्रातील मच्छीमारांनी या निर्णयाचे स्वागत करत मंत्री नितेश राणे यांचे अभिनंदन केले आहे.
हॅशटॅग्स:
#मत्स्यव्यवसाय #कृषीदर्जा #मच्छीमार #नितेशराणे #महाराष्ट्रशासन #शासननिर्णय #सवलती #किसानक्रेडिटकार्ड #मत्स्यपालन #मच्छीमारआंदोलन
फोटो