खराब रस्त्यांबाबत १९ मेच्या लोकशाही दिनात विचारणार जाब
सक्षम अधिकारी हजर करा, अन्यथा उपोषणाचा इशारा – गुहागर प्रेमी नागरिकांची प्रशासनाकडे ठाम मागणी
आबलोली (संदेश कदम) – गुहागर शहर ते तिसरे वाकण शासकीय विश्रामगृह या दरम्यान रस्त्याची अतिशय खराब अवस्था असून त्यावर दर्जेदार कार्पेट टाकण्याची मागणी नागरिकांकडून सातत्याने करण्यात येत आहे. मात्र मागील लोकशाही दिनात दिलेली आश्वासने फोल ठरल्याने यंदाच्या १९ मेच्या लोकशाही दिनात प्रशासनाला जाब विचारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर गुहागर तालुक्यातील मोडका आगर येथील विशाल बोटिंग क्लब येथे नागरिकांची विशेष सभा झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी अनिल शिंदे होते. यावेळी नागरिकांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे सक्षम अधिकारी लोकशाही दिनात उपस्थित राहतील याची हमी प्रशासनाने घ्यावी, अशी ठाम मागणी केली.
बैठकीत पी. एम. कोर्टात खराब रस्त्याबाबत तक्रार दाखल करणे, जिल्हा पोर्टलवर मोठ्या प्रमाणात तक्रारी नोंदवणे तसेच लोकशाही दिनात उत्तर न मिळाल्यास लाक्षणिक उपोषण छेडण्याचा इशारा देण्यात आला. हे उपोषण नागरिकांच्या विश्वासात घेऊन शांततापूर्ण पद्धतीने केले जाईल, असा निर्धारही करण्यात आला.
बैठकीस मुंबईचे मनोहर घुमे, विश्वनाथ रहाटे, अनिल शिंदे, नितीन खानविलकर, अरुण भूवड, अनिल रावणंग व जेष्ठ पत्रकार पराग कांबळे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गुहागर फोरमच्या स्थापनेचा प्रस्ताव मांडण्यात आला, जो तालुक्याच्या राजकारण विरहित विकासासाठी उपयुक्त ठरेल, असे उपस्थितांचे मत होते.
सभेअंती विश्वनाथ रहाटे यांनी सर्वांचे आभार मानले.
#गुहागर #रस्त्यांचीदुरवस्था #लोकशाहीदिन #नागरिकांचीमागणी #सक्षमअधिकारी #गुहागरफोरम #रत्नागिरी #जनआंदोलन
फोटो