रत्नागिरी बसस्थानकाचे लोकार्पण; रत्नदुर्ग किल्ल्यावर दिव्यांगांसाठी लिफ्टला मंजुरी
बसस्थानक हेच आपले घर मानून स्वच्छता राखा – पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांचे आवाहन
बातमी ..
रत्नागिरी | जिल्ह्यातील प्रवासी सुविधांचा कायापालट होत असून, रत्नदुर्ग किल्ल्यावर दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लिफ्ट बसविण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय रत्नागिरी बसस्थानकाच्या नूतन इमारतीचा लोकार्पण सोहळा आज पार पडला.
या कार्यक्रमात पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले की, “बसस्थानक हे आपले घर आहे. त्याची निगा राखणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे.” त्यांनी प्रवाशांसाठी विविध सुविधा देतानाच कर्मचाऱ्यांसाठी वातानुकुलित विश्रांतीकक्षही उपलब्ध केल्याचे सांगितले.
या लोकार्पण सोहळ्याला फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, माजी आमदार राजन साळवी, उदय बने, अपर जिल्हाधिकारी भाऊसाहेब गलांडे, परिक्षीत यादव आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले.
फळोत्पादन मंत्री गोगावले म्हणाले की, “उदय सामंत हे विकासाचे रत्न आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील विकास त्यांच्या नेतृत्वामुळे शक्य झाला आहे.” तर राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले की, “दापोली, खेड, मंडणगडमध्ये प्रशासकीय इमारतींसाठी 120 कोटींहून अधिक निधी मंजूर झाला असून, रत्नागिरीचे बसस्थानक राज्यातील रोल मॉडेल ठरेल.”
या नव्या बसस्थानकामध्ये सुशिक्षित बेरोजगारांसाठी रोजगार निर्माण करण्याचे नियोजन असून, कोकणी पदार्थ विक्रीसाठी खास गाळे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. धूतपापेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 12 कोटींचा निधी तर कसबा संगमेश्वर येथे छत्रपती संभाजी महाराजांचे जागतिक स्मारक उभारण्याचे काम सुरू असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.
हॅशटॅग्स:
#रत्नागिरीबसस्थानक #उदयसामंत #रत्नदुर्गकिल्ला #विकासकामे #कोकणविकास #शिवस्मारक #रोलमॉडेलस्थानक #स्वच्छरत्नागिरी
फोटो