???? कॅलिफोर्नियापेक्षा कोकण सरस करू – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
कोकणातील विकासात पत्रकारांनी सहभागी व्हावे – पत्रकार कार्यशाळेचे रत्नागिरीत उद्घाटन
रत्नागिरी, १ जून | “कोकणचा निसर्ग, वारसा आणि संस्कृती इतकी समृद्ध आहे की, तो कॅलिफोर्नियाहूनही अधिक सरस करता येईल. परदेशी पर्यटक कोकण पाहण्यासाठी येतील, असा दर्जा आपण निर्माण करू शकतो. मात्र त्यासाठी माध्यमांनीही आपली भूमिका बजावावी,” असे स्पष्ट मत उद्योग, मराठी भाषा व पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी व्यक्त केले.
कोकण विभागातील पत्रकारांसाठी आयोजित दोन दिवसीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. ही कार्यशाळा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आली आहे.
डॉ. सामंत म्हणाले की, “कोकण पत्रकारितेचा उगमस्थान आहे. बाळशास्त्री जांभेकर, टिळक, बाबूराव पराडकर यांचा वारसा या भूमीला लाभलेला आहे. त्यामुळे कोकणातील पत्रकारांमध्ये विशिष्ट ताकद आहे. समाज माध्यमांच्या युगात पत्रकारांची जबाबदारी अधिक वाढली आहे. राज्यकर्त्यांकडून योग्य निर्णय होण्यासाठी माध्यमांनी सकारात्मक दडपण निर्माण करावे.”
या कार्यशाळेच्या माध्यमातून पत्रकारांसाठी राज्यभर अशा प्रशिक्षण उपक्रमांचे आयोजन केले जाईल, असेही त्यांनी सांगितले. “आपत्कालीन परिस्थितीतही पत्रकार कार्यरत असतात. त्यांच्या मागे शासनाने ठामपणे उभे राहिले पाहिजे. पत्रकारांसाठी आवश्यक सेवा-सुविधांची निर्मिती हे आपले कर्तव्य आहे,” असेही ते म्हणाले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी महासंचालक ब्रिजेश सिंह, संचालक हेमराज बागुल, उपसंचालक अर्चना शंभरकर, विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्ष मनोज जालनावाला, विविध जिल्ह्यांचे माहिती अधिकारी, नामवंत पत्रकार आणि पत्रकार संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मनोज सानप यांनी तर प्रास्ताविक अर्चना शंभरकर यांनी केले.
#कोकणविकास #उदयसामंत #पत्रकारकार्यशाळा #RatnagiriNews #KonkanJournalism #CaliforniaVsKonkan #MediaMatters #पत्रकारिता #KonkanTourism
????️ फोटो