📰 अखेर गुहागर तालुक्यातही त्या पदाधिकाऱ्यांचं ठरलं!
गुहागरमधून मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश निश्चित; २६ जुलै रोजी रत्नागिरीत मोठा शक्तीप्रदर्शनाचा अंदाज
गुहागर (प्रतिनिधी):
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चांना अखेर पुर्णविराम मिळत असून, गुहागर तालुक्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटातील काही महत्त्वाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आगामी २६ जुलै रोजी शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे.
हा पक्षप्रवेश सोहळा रत्नागिरी येथे राज्याचे पालकमंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे.
पदाधिकाऱ्यांचा विश्वासघाताची भावना
गुहागरमधील अनेक पदाधिकारी मागील काही महिन्यांपासून ठाकरे गटाच्या स्थानिक नेतृत्वाकडे नाराज होते. विकासकामांसाठी निधी न मिळणे, स्थानिक प्रश्नांबाबत दुर्लक्ष, आणि वरिष्ठांकडून दखल न घेतली जाणे या कारणांमुळे या नाराजीने उग्र रूप धारण केले. अनेक कार्यकर्त्यांनी अंतर्गत बैठकीत ही नाराजी व्यक्त केली होती.
शक्तीप्रदर्शनाची तयारी सुरू
गुहागरमधून १५-२० गाड्यांमधून कार्यकर्ते, पदाधिकारी आणि समर्थक रत्नागिरीतील कार्यक्रमासाठी रवाना होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. यात विभागप्रमुख, शाखाप्रमुख, सरपंच, उपसरपंच, मच्छीमार सोसायटीचे चेअरमन व संचालक, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य आदींचा समावेश असणार आहे.
तथापि, रत्नागिरी वार्ताहरला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार, प्रत्यक्षात फक्त ८ ते १० गाड्या बुक करण्यात आल्या आहेत. शिवाय, एक पंचायत समिती सदस्य आणि एक जिल्हा परिषद सदस्य अद्याप निर्णयाच्या उंबरठ्यावर नसून, त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत त्यांची भूमिका स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
गुहागरच्या खाडी पट्ट्यातून नवा झेंडा
हे राजकीय प्रवेश फक्त वैयक्तिक पातळीवर नाहीत, तर संपूर्ण खाडी पट्ट्यातील (विशेषतः मच्छीमार समाज व गाव पातळीवरील नेतृत्त्व) नेतृत्वाची मानसिकता दर्शवतात. यामुळे ठाकरे गटासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
आ.भास्कर जाधव यांच्यासाठी चिंतेची घंटा?
गुहागर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार भास्कर जाधव यांच्या बालेकिल्ल्यातच अशा प्रकारचे पक्षांतर होणे म्हणजे त्यांच्या नेतृत्वालाच आव्हान देणारी गोष्ट आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही घटना ठाकरे गटाच्या गणितात मोठा उलथापालथ करू शकते.
येत्या काही दिवसात जिल्ह्याच्या राजकारणात काय बदल घडतील हे आगामी काळ ठरवेल…..
📌
ही पण बातमी वाचा वरील विषय संदर्भ 📎 |
—
📌 ‘रत्नागिरी वार्ताहर’ आगामी पक्षप्रवेश सोहळ्याचे थेट अपडेट्स, फोटो व प्रतिक्रिया देणार. सदर बातमीचे पुढील भागांसाठी आमच्या वेबसाइटला भेट द्या.
—
🔖 #गुहागर #शिवसेनाUBT #शिंदेगट #उदयसामंत #किरणसामंत #भास्करजाधव #रत्नागिरीराजकारण #पक्षप्रवेश #ZPNivadnuk2025 #गुहागरनिवडणूक
—
📸 फोटो
🖊️ बातमी स्रोत – रत्नागिरी वार्ताहर प्रतिनिधी नेटवर्क