*“श्री गणेशा, विनाशकारी MIDC पासून आमचा गाव वाचव!” — ग्रामस्थांची आर्त प्रार्थना*
खंडाळा प्रतिनिधी : निलेश रहाटे
रत्नागिरी तालुक्यातील वाटद येथे प्रस्तावित MIDC प्रकल्प रद्द व्हावा, शेती–पर्यावरण आणि गावाचे अस्तित्व टिकून राहावे, यासाठी ग्रामस्थांनी गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर श्री गणेशाच्या चरणी साकडे घालून आर्त विनंती केली.
गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात गावकऱ्यांनी प्रशासनाला जाग आणणारा संदेश दिला —
👉 “गाव वाचवा, शेतकरी वाचवा!”
गावोगावी, वाड्यावस्त्यांमध्ये आणि घराघरांत बॅनर लावून “MIDC नको” असा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे.
ग्रामस्थांनी श्री गणेशाला नारळ, फुले व ओव्या अर्पण करत —
“गणेशा, आमच्या मातीतला विनाश थांबव… गावाला संकटातून वाचव!” अशी मनापासून प्रार्थना केली.
व सर्वांनी हात जोडून गाव रक्षणाची शपथ घेतली.
यापूर्वीही ग्रामस्थांनी MIDC विरोध ठामपणे नोंदवला आहे. तरीही सरकार विकासाच्या नावाखाली प्रकल्पाला गती देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे शेवटी विजय कुणाचा होणार — शासनाचा की आपल्या मातीसाठी उभ्या असलेल्या ग्रामस्थांचा — हा प्रश्न आता गंभीर स्वरूप धारण करताना दिसत आहे.
ग्रामस्थांचा ठाम विश्वास आहे की श्री गणेशाच्या कृपेने हा प्रकल्प कायमस्वरूपी रद्द होईल आणि गावाचा खरा विकास पारंपरिक शेती, स्थानिक उद्योग व नैसर्गिक साधनसंपत्ती यांच्यातूनच साध्य होईल.
“गाव वाचवणे हीच खरी आरती… आणि श्री गणेशा पाठीशी राहो हीच खरी प्रार्थना!”
ग्रामस्थांचा अंतिम निर्धार :
“विकास हवा, पण गावाचा विनाश नको!
शेती, जमीन आणि भवितव्य वाचवण्यासाठी आम्ही शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहू.
सत्याचा विजय श्री गणेशाच्या कृपेने नक्कीच होईल, याची आम्हाला खात्री आहे असे ग्रामस्थ बोले.