मत्स्यव्यवसाय व सागरी सुरक्षेसाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर गरजेचा – मंत्री नितेश राणे
मुंबई: सध्याचा काळ एआय (कृत्रिम बुद्धिमत्ता) तंत्रज्ञानाचा असून, त्याचा उपयोग मत्स्योत्पादन वाढवण्यासाठी आणि सागरी सुरक्षा बळकट करण्यासाठी करणे अत्यावश्यक आहे, असे मत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केले.
मंत्रालयात आयोजित बैठकीत देशभरातील एआय तंत्रज्ञान क्षेत्रातील विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. सागरी सुरक्षेसाठी सध्या ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यातून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे एआय तंत्रज्ञानाचा अधिक प्रभावी वापर कसा करता येईल, यावर विद्यार्थ्यांनी विचार मांडावेत, असे आवाहन त्यांनी केले.
मत्स्योत्पादन आणि सुरक्षा यासाठी एआय तंत्रज्ञानाच्या संधी
मासेमारी क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी पारंपरिक आणि आधुनिक मच्छीमारांच्या गरजा लक्षात घेऊन प्रत्येक जिल्ह्याच्या आवश्यकतानुसार एआय प्रणाली विकसित करावी, असे मंत्री राणे म्हणाले. विद्यार्थ्यांनी मुख पडताळणी (फेस रेकग्निशन) प्रणाली, किनारा मॅपिंग, जीपीएस फेन्सिंग, तलावांचे मॅपिंग, हवामान अंदाज वर्तवणारी यंत्रणा अशा अनेक संकल्पना मांडल्या.
विद्यार्थ्यांनी सुचवलेल्या संकल्पनांच्या आधारावर GYAN संस्थेला एक परिपूर्ण कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या. हे मॉडेल देशासाठी दिशादर्शक ठरेल आणि महाराष्ट्राला मत्स्यव्यवसायात आघाडीवर ठेवण्यास मदत करेल, असा विश्वास मंत्री राणे यांनी व्यक्त केला.
बैठकीत मानद सल्लागार योगेश राव, डॉ. उमेश राऊत, नकुल प्यासी यांच्यासह देशभरातील विद्यार्थी प्रत्यक्ष व दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांच्या एआय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल मंत्री राणे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. राज्यात एक एआय आधारित मॉडेल विकसित करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या.