राजापूर अर्बन बँकेच्या लांजा शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

राजापूर अर्बन बँकेच्या लांजा शाखेचे स्वमालकीच्या जागेत स्थलांतर

लांजा : डिजिटल बँकिंगकडे वाटचाल करत असताना ग्राहकांना केंद्रस्थानी ठेवत राजापूर अर्बन बँक दर्जात्मक सेवा देण्यास कटिबद्ध आहे. याच धोरणाच्या अनुषंगाने, लांजा शाखा दि. २२ फेब्रुवारी २०२५ रोजी स्वमालकीच्या जागेत स्थलांतरित करण्यात आली.

 

ही शाखा २४ ऑक्टोबर १९९९ पासून भाड्याच्या जागेत कार्यरत होती. मात्र, बँकेच्या सर्व शाखा स्वतःच्या मालकीच्या जागेत असाव्यात, अशी मागणी वार्षिक सर्वसाधारण सभेत सभासदांकडून सातत्याने होत होती. संचालक मंडळाने हा निर्णय दूरदृष्टीने विचार करून घेतला आणि लांजा बाजारपेठेतील मोक्याच्या ठिकाणी, मुंबई-गोवा महामार्गाजवळील मारीगोल्ड बिल्डिंगमध्ये नवीन जागेत शाखा स्थलांतरित करण्यात आली.

 

स्थलांतर सोहळ्याला मान्यवरांची उपस्थिती

 

बँकेच्या अध्यक्षा सौ. अनामिका जाधव यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या उद्घाटन सोहळ्यास लांजा तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष श्री. प्रसन्न शेट्ये, को-ऑपरेटिव्ह बँक्स एम्प्लॉईज युनियन रत्नागिरीचे कार्याध्यक्ष श्री. सुनील साळवी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी बँकेचे संचालक, व्यवस्थापन मंडळाचे सदस्य, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेखरकुमार अहिरे, सहा. सरव्यवस्थापक श्री. लक्ष्मण म्हात्रे, शाखाधिकारी सौ. साक्षी भोसले, कर्मचारीवर्ग, पत्रकार बंधू तसेच ग्राहक, सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

विद्यार्थ्यांचा व ग्राहकांचा सन्मान

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बँकेचे संचालक श्री. दिनानाथ कोळवणकर यांनी केले, तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेखरकुमार अहिरे यांनी बँकेच्या आर्थिक स्थितीचा आढावा सादर केला. यानंतर उपस्थित मान्यवरांनी बँकेच्या प्रगतीसाठी शुभेच्छा देत आपली मनोगते व्यक्त केली.

 

लांजा पंचक्रोशीतील अनेक प्रतिष्ठित नागरिक, पतपेढ्यांचे पदाधिकारी, ग्राहक आणि बँकेच्या हितचिंतकांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विशेष म्हणजे, शालेय शिक्षणात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा बँकेच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.

 

ग्राहकांनी अधिकाधिक व्यवहार करण्याचे आवाहन

 

अध्यक्षीय भाषणात सौ. अनामिका जाधव यांनी लांजा शाखेमार्फत दर्जेदार बँकिंग सेवा देण्याची ग्वाही दिली. तसेच, जास्तीत-जास्त ग्राहकांनी या शाखेच्या माध्यमातून बँकिंग व्यवहार करावेत, असे आवाहनही केले.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बँकेचे लेखापाल श्री. रमेश काळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन ज्येष्ठ संचालक श्री. जयंत अभ्यंकर यांनी व्यक्त केले.

 

या स्थलांतर सोहळ्यामुळे लांजा शहरातील बँकिंग सुविधा अधिक सशक्त होणार असून, ग्राहकांना आता आधुनिक आणि उत्कृष्ट बँकिंग सेवा मिळणार आहेत.

 

Raju Sagvekar
Author: Raju Sagvekar

???? राजू सागवेकर ???? वार्ताहर (ग्रामीण ) - रत्नागिरी वार्ताहर डिजिटल बातमीपत्र ता.राजापुर - 416702

Leave a Comment

आणखी वाचा...