मंडणगडमध्ये युवकावर तलवारीने हल्ला; संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात
मंडणगड (रत्नागिरी): मंडणगड तालुक्यातील म्हाप्रळ येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. २० वर्षीय युवकावर तलवारीने प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार मंडणगड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
हल्ल्याचा प्रकार:
6 मार्च 2025 रोजी रात्री 10.45 वाजण्याच्या सुमारास परेरा फार्म हाऊसकडे जाणाऱ्या रस्त्यावर अहमद अब्दुल मझीद मुंगरुस्कर (वय 20, रा. म्हाप्रळ) या तरुणावर तंजीम तौफिक मुकादम (रा. म्हाप्रळ) या व्यक्तीने कोणतेही कारण नसताना तलवारीने हल्ला केला. फिर्यादीच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांच्या पंजांवर वार करून तसेच हाताने मारहाण करत त्याचा खून करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पोलिसांची तातडीची कारवाई:
या प्रकरणी मंडणगड पोलिसांनी आरोपीविरोधात बी. एन. एस. 109 (1) 118(2) अन्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत संशयित आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.