मिठगवाणे येथे आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ नागरिक संघटनेचे स्नेहसंमेलन
राजू सागवेकर/राजापूर
राजापूर तालुक्यातील मिठगवाणे येथे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्थेच्या वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. या विशेष प्रसंगी आमदार किरण सामंत यांनी उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांच्या आशीर्वादाचा लाभ घेतला. संघटनेच्या वतीने आमदार किरण सामंत यांचा भव्य सत्कार करण्यात आला.
या वेळी बोलताना आमदार किरण सामंत म्हणाले, “माझ्या जडणघडणीत ज्येष्ठ नागरिकांचा मोठा वाटा आहे. त्यांच्या आशीर्वादामुळेच मी आज या पदावर आहे. त्यांच्या सेवेसाठी मी सदैव कटिबद्ध आहे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी मी तुमच्यासोबत आहे. आपल्या गरजा पूर्ण करण्यासाठी जे काही शक्य आहे, ते मी नक्की करेन,” असे त्यांनी आश्वासन दिले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सभापती विलास चालके, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजू कुरूप, दीपक कुवळेकर, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गव्हाणकर, शेखर कुमार अहिरे, मारुती आंब्रे, अशपाक हाजू, विलास चेऊळकर, दीपक नागले यांसह अनेक मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मिठगवाणे पंचक्रोशी ज्येष्ठ नागरिक संस्था वृद्धांना एकत्र आणण्यासाठी आणि त्यांना आवश्यक मदत देण्यासाठी नेहमीच कार्यरत असते. या संस्थेच्या पुढील उपक्रमांसाठीही सर्वांनी पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले.