गुहागरच्या महिला शिक्षिकेचा राज्यस्तरावर गौरव!
तवसाळ तांबडवाडीच्या श्रीमती माधवी मारुती पाटील यांची ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड

गुहागर – तवसाळ
गुहागर तालुक्यातील मौजे तवसाळ तांबडवाडी येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षिका श्रीमती माधवी मारुती पाटील यांची महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यावतीने प्रदान करण्यात येणाऱ्या प्रतिष्ठेच्या ‘आयडॉल शिक्षक पुरस्कार २०२६-२७’ साठी निवड झाली आहे. त्यांच्या या यशामुळे तवसाळ तांबडवाडीसह पडवे केंद्र आणि संपूर्ण गुहागर तालुक्याच्या शैक्षणिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदान, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न, गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राबवलेले नाविन्यपूर्ण उपक्रम आणि प्रभावी अध्यापन पद्धती यांची दखल घेत त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, त्यांच्या अंगभूत कलागुणांना वाव मिळावा आणि शिक्षण प्रक्रिया अधिक आनंददायी व रंजक व्हावी, यासाठी माधवी पाटील यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच त्यांच्यात आत्मविश्वास, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान विशेष कौतुकास्पद आहे.
शिक्षक हा केवळ ज्ञान देणारा नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्याचा शिल्पकार असतो, या भावनेतून कार्य करणाऱ्या माधवी पाटील यांच्या शैक्षणिक कार्याची राज्यस्तरावर दखल घेतली जाणे ही तवसाळ तांबडवाडीच्या आदर्श शाळेसाठी अभिमानाची बाब ठरली आहे.
या यशाबद्दल शाळा व्यवस्थापन समिती तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. अंकुर मोहिते यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. शिक्षणप्रेमी श्री. सचिन कुळये यांनीही दूरध्वनीद्वारे त्यांचे अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. ग्रामस्थ, महिला मंडळ आणि मुंबई युवक मंडळाच्या वतीनेही त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
माधवी मारुती पाटील यांच्या या यशामुळे जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक आदर्श शाळा तवसाळ तांबडवाडीच्या नावलौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांच्या या सन्मानामुळे ग्रामीण भागातील शिक्षक आणि शिक्षण क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांना नवी प्रेरणा मिळणार आहे.
श्रीमती माधवी मारुती पाटील यांचे या उल्लेखनीय यशाबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा!










