हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती राजापूरची नियोजन बैठक संपन्न.
प्रशांत पवार यांजकडून.
राजापूर | हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समिती राजापूर यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात येणार आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी सोमवार, दि. २४ मार्च २०२५ रोजी राजापूरच्या ग्रामदेवता श्री निनादेवी मंदिर येथे बैठक संपन्न झाली.
या बैठकीत हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत राजापूर शहरातील सर्व वाडीतील भजनी मंडळे, संप्रदाय, आणि दिंडी यांनी सहभागी व्हावे, यासाठी त्यांना आवाहन पत्र देण्याचे ठरले. तसेच धार्मिक, पौराणिक व ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून काही मंडळी या यात्रेत सहभागी होणार आहेत. सामाजिक संदेश देणारी पदयात्राही या निमित्ताने काढण्यात येणार आहे.
विविध संघटना, मंडळे, संप्रदाय, संस्था आणि प्रतिष्ठान यांनी तन, मन आणि धनाने या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. तसेच ढोल पथक, लेझीम पथक आणि भजनी मंडळांनीही या नववर्ष स्वागत यात्रेत सहभागी व्हावे, असे ठरविण्यात आले. हिंदू धर्माचे प्रतीक म्हणून प्रत्येकाने कपाळावर टिळक लावून पारंपरिक वेशभूषेत सहभागी होण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.
यात्रेचे यशस्वी आयोजन करण्यासाठी उपस्थित हिंदू बांधवांनी जबाबदाऱ्या वाटून घेतल्या. या यात्रेत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुशे यांनी केले.
या बैठकीस संदेश टिळेकर, महेश मयेकर, विनोद गादिकर, अभिजित नार्वेकर, प्रसन्न देवस्थळी, रमेश गुणे, किरण शिवलकर, विवेक गुरव, सौ. सुयोगा जठार, शंकर सोलगावकर, दिलीप गोखले यांसह राजापूर शहर व परिसरातील अनेक हिंदू बांधव उपस्थित होते.