ओबीसी विद्यार्थ्यांसाठी लक्ष्मण हाके यांचे समुद्रात उतरून आंदोलन
मुंबई: महाराष्ट्रात मागील काही काळापासून ओबीसी विरुद्ध मराठा हा संघर्ष सुरू आहे. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं, अशी मनोज जरांगे पाटील यांची आग्रही मागणी आहे. त्यांनी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत धडकण्याचा सरकारला इशारा दिला आहे. एकीकडे मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जरांगे आग्रही असताना, आता ओबीसी नेते लक्ष्मण हाके आक्रमक झाले आहेत.
ओबीसी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी त्यांनी गिरगाव चौपाटीवर थेट समुद्रात उतरून आंदोलन केलं. यावेळी लक्ष्मण हाकेंसह कार्यकर्त्यांनी ‘उठ ओबीसी जागा हो, संघर्षाचा धागा हो’ अशा जोरदार घोषणा देत सरकारचा निषेध केला. सरकारमधील ओबीसी नेत्यांचा आणि मंत्र्यांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.
उपस्थित विद्यार्थ्यांनी ‘महाज्योती’ योजनेवर सरकारकडून दुजाभाव केला जात असल्याचा आरोप केला. ‘सारथी’ आणि ‘बार्टी’ यांसारख्या योजनांना सरकार भरभरून अनुदान देत असताना, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी असलेल्या ‘महाज्योती’ योजनेला मात्र निधी दिला जात नाही, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे. ‘सारथी’ आणि ‘बार्टी’च्या विद्यार्थ्यांना नोंदणीच्या दिवसापासून फेलोशिप मिळत आहे, पण ‘महाज्योती’ला निधी मिळत नाही. तीन वर्षांपासून विद्यार्थी निधीसाठी संघर्ष करत आहेत, पण सरकारकडून दखल घेतली जात नाहीये. यामुळेच आज समुद्रात उतरून आंदोलन करत असल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी मांडली.
लक्ष्मण हाकेंच्या या आंदोलनानंतर पोलीस प्रशासन तातडीने गिरगाव चौपाटीवर दाखल झालं. पोलिसांनी पाण्यात शिरून लक्ष्मण हाकेंसह त्यांच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं आहे.

Author: Sujit Surve
Sujit surve * Ratnagiri vartahar* Digital news Media creators