लाडक्या बहिणी’मुळे शिवभोजन थाळी बंद पडण्याच्या स्थितीत!
♦ शासनाच्या अनेक फुकट दिलेल्या योजना बंद करण्याची हालचाली .
♦ शासनाच्या तिजोरीवर लाडक्या बहीणी मुळे ताण.
रत्नागिरी– ( वार्ताहर) गरीब मजूर, कामगारांची उपासमार टाळण्यासाठी शासनाने अवघ्या १० रुपयांत शिवभोजन थाळी सुरू केली; परंतु शिवभोजन थाळी केंद्रांना आता घरघर लागली आहे. जिल्ह्यातील २६ पैकी आता फक्त १२ केंद्रे सुरू आहेत. १४ केंद्रे बंद झाली आहेत.
लाडक्या बहीण योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी शिवभोजन थाळी बंद करण्याच्या शासनाच्या हालचाली आहेत. या योजनेंतर्गत एप्रिल ते डिसेंबर २०२४ पर्यंत २ कोटी ४८ लाख ८९ हजार अनुदान प्राप्त झाले असून, ८९ लाख ९३ हजार ७५० एवढे अनुदान शिल्लक आहे. शासनाकडूनदहा रुपयांत शिवभोजन थाळी सुरू करण्यात आली. यात दहा रुपयांत पोटभर जेवण मिळते. कोरोना काळात तत्कालीन शासनाकडून ही थाळी मोफत दिली जात होती. आता पुन्हा ती दहा रुपयांत देण्यात येते. यासाठी केंद्रचालकांना ४० रुपये अनुदान देण्यात येते; मात्र, हे अनुदान महागाईमुळे आता अपुरे पडत आहे.
जिल्ह्यातील २६ शिवभोजन केंद्रे मंजूर आहेत त्यांना ३०५० थाळ्या मंजूर आहेत; परंतु या केंद्रांपैकी १२ केंद्रेच सुरू आहेत.