शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात AI-आधारित ई-फील्ड लायब्ररीचा यशस्वी प्रयोग! QR कोड स्कॅन करून महाविद्यालयातील पिके आणि झाडांची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर!

👇बातम्या ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात AI-आधारित ई-फील्ड लायब्ररीचा यशस्वी प्रयोग!
QR कोड स्कॅन करून महाविद्यालयातील पिके आणि झाडांची सविस्तर माहिती आता एका क्लिकवर!

बातमी – संदेश कदम 
चिपळूण तालुक्यातील शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालय, खरवते-दहिवली येथे ए.आय. (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) तंत्रज्ञानाचा वापर करून कृषी ई-प्रक्षेत्र ग्रंथालय हा महाराष्ट्रातील पहिला नाविन्यपूर्ण आणि संशोधनात्मक प्रयोग यशस्वीरित्या साकारण्यात आला आहे. चिपळूण-संगमेश्वर विधानसभा मतदारसंघाचे आमदार शेखरजी निकम आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांच्या उपस्थितीत या अत्याधुनिक वेब पोर्टलचे उद्घाटन मोठ्या उत्साहात पार पडले.
बदलत्या काळात कृषी शिक्षणाला ए.आय. तंत्रज्ञानाची जोड देऊन पिके, शोभिवंत झाडे, फुले, फळे आणि भाजीपाला यांची विस्तृत माहिती विद्यार्थ्यांपर्यंत मोबाईलद्वारे एका क्लिकमध्ये उपलब्ध करून देणे, तसेच त्यांच्या कृषी ज्ञानात भर घालण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प साकारण्यात आला आहे. प्रा. प्रशांत पवार आणि प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांनी अथक तीन महिन्यांच्या परिश्रमातून ही संकल्पना प्रत्यक्षात आणली.
महाविद्यालयाला भेट देणारे शेतकरी, पर्यटक आणि कृषी तज्ज्ञ यांना या ई-ग्रंथालयाच्या माध्यमातून झाडांची आणि पिकांची सहज ओळख पटणार आहे. यात पिकांचे शास्त्रीय नाव, त्यावर प्रादुर्भाव करणारे रोग, कीटक आणि त्यांचे व्यवस्थापन इत्यादींची सविस्तर माहिती समाविष्ट आहे. महाविद्यालयाच्या आवारातील सर्व झाडांजवळ हे QR कोड लावण्यात आले आहेत. भविष्यात महाविद्यालयाच्या ३५० एकर क्षेत्रावर हा उपक्रम राबवण्याचा प्रा. प्रशांत पवार आणि विद्यार्थी महेश कोरे, मांतेश कोरे, आदिती पवार, वरद पाटील आणि अभिजीत झांबरे यांचा मानस आहे.
या प्रयोगाच्या उद्घाटनप्रसंगी आ. शेखर निकम यांनी प्रा. प्रशांत पवार आणि सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक करत अभिनंदन केले. भविष्यात कृषी क्षेत्राच्या विस्तारीकरणासाठी आणि येणाऱ्या संकटांना शास्त्रीयदृष्ट्या तोंड देण्यासाठी ए.आय. तंत्रज्ञान उपयुक्त ठरेल, असे ते म्हणाले. लवकरच शरदचंद्रजी पवार कृषी महाविद्यालयात ए.आय. तंत्रज्ञान केंद्र सुरू करण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, या विषयातील काही आंतरराष्ट्रीय संस्थांशी संलग्न होऊन, त्यांच्याशी करार करून कोकणातील एकमेव संशोधन केंद्र उभारणार असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत देशाचे माजी कृषी मंत्री शरदचंद्रजी पवार यांच्यासोबत चर्चा झाली असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या या संकल्पनेला विस्तारित स्वरूप देण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. या प्रयोगाला यशस्वी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. सुनितकुमार पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. याप्रसंगी महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग, रत्नागिरीचे कार्यकारी अभियंता श्री. कोंडा आणि उपव्यवस्थापक अधिकारी श्री. काजरोळकर हे देखील उपस्थित होते.

 

#SharadchandraPawarAgricultureCollege #AIinAgriculture #EFieldLibrary #AgricultureTechnology #KrushiVikas #Chipalun #MaharashtraAgriculture #SmartFarming #DigitalAgriculture #FarmInnovation #कृषीतंत्रज्ञान #शेतकरी #डिजिटलभारत

Team Ratnagiri Vartahar
Author: Team Ratnagiri Vartahar

Official Ratnagiri vartahar Media creators & RV News YouTube Channel.

Leave a Comment

आणखी वाचा...


error: Content is protected !!